औरंगाबाद: गोव्याला जात असताना बेळगाव-पुणे महामार्गावर रविवारी कारचे चाक फुटून झालेल्या भीषण अपघातात दौलताबाद व शरणापूर येथील सात तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत झालेल्या सात तरुणांचे मृतदेह आज सकाळी शरणापूर, दौलताबाद येथे आणण्यात आले. आज सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मृतांचे नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दुर्घटनेमुळे दौलताबाद व शरणापूरवर शोककळा पसरली आहे. आजही गावात चूल पेटली नाही.
महेश नंदू पांढरे, गोपाळ कडूबा वरकड, नंदू किशन पवार, अमोल हरिश्चंद्र निळे, अमोल चौरे, रवींद्र मच्छिंद्र वाडेकर, सुरज कैलास कान्हेरे अशी या अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. रविवारी सायंकाळी अपघाताची माहिती मृत गोपाळ वरकड यांच्या भावाच्या मोबाईलवर मिळाली. मात्र, त्यांचा या घटनेवर विश्वासच बसत नव्हता. त्यांना लागलीच सोशल मीडियावर अपघाताची काही चित्रे पाहायला मिळाली.
या अपघाताची माहिती वार्यासारखी दौलताबाद, शरणापूर परिसरात पसरली. परिसरातील नागरिकांनी तातडीने बेळगाव येथील पोलिसांशी संपर्क साधून अपघाताची माहिती जाणून घेतली. तरुणांच्या नातेवाईकांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली. काल सोमवारी सातही मृत तरुणांचे शवविच्छेदन करून आज सकाळी त्यांचे मृतदेह शरणापूर व दौलताबाद येथे आणण्यात आले. आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच वेळी सात तरुणांवर अंत्यसंस्कार करण्याची या परिसरातील ही पहिलीच वेळ होती.